राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाण्यास विरोध केल्याने खासदार उदयनराजे भोसले आहेत तिथेच थांबतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हणजेच उदयनराजे भोसले राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपात जातील या चर्चांना यू-टर्न मिळाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.  पुण्यात भाजपा प्रवेशासाठी घेतलेली बैठक स्थगित करण्यात आली. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उदयनराजेंच्या प्रवेशाला खो घातला होता यामुळेही उदयनराजेंचा भाजपा प्रवेश लांबणीवर पडला आहे.

उदयनराजेंचा भाजपा प्रवेश हा गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय आहे. त्यावरून विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. उदयनराजेंनी भाजपात जाऊ नये यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याचं समजतं आहे. एवढंच नाही तर खासदार डॉ. अमोल कोल्हे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उदयनराजेंची भेट घेत त्यांना राष्ट्रवादी सोडू नका अशी विनंती केली होती.

या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंनी आज पुण्यात काही कार्यकर्त्यांची भाजपमध्ये जायचं की राष्ट्रवादीतच राहायचं यासाठी एका हॉटेलमध्ये बैठक बोलावली होती. त्यामुळे अनेक कार्यकर्ते पुण्यात हजर झाले होते.अचानक ही बैठक रद्द करण्यात आली. यामुळे उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने नवे वळण घेतले आहे. या बैठकीनंतर उदयनराजे हे भाजप प्रवेशावर यू-टर्न घेत राष्ट्रवादीतच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘आहे तिथंच उत्तम आहे. भाजपात जाणं धोक्याचं ठरू शकतं’ असं म्हणत जवळच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना राष्ट्रवादीतच राहण्याचा आग्रह केला.


Find out more: