लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसारच भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावला आहे.
त्याचाच पुढचा भाग म्हणून राष्ट्रवादीला राम राम करत अवधूत तटकरे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे रायगडात राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अवधुत तटकरे यांनी मातोश्रीवर आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.
यावेळी अवधूत तटकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांशी पक्षबदलाबाबत चर्चा सुरू होती. अजितदादा पवार यांच्याशी एकदा चर्चा झाली होती. माझ्या व्यथा मी त्यांच्याकडे मांडल्या होत्या. पण मी पक्षबदलाच्या निर्णयापर्यंत पोहचलो होतो. मी कोणावरही नाराज नाही. राजकीय महत्वकांक्षा काहीशी आहेच. मला तिकीट मिळणार म्हणून मी पक्षात आलेलो नाही. तर काकांशी पक्षबदलाबाबत काहीही बोलणं झालेलं नाही.
दरम्यान राज्यात पुन्हा एकदा काका पुतण्या वाद उफाळून येणार आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते आणि खा. सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झाले आहेत. गेले काही दिवस अवधूत तटकरे यांच्या पक्ष बदलाची चर्चा होती. तर याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी भेट देखील झाली होती.