पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम म्हणजे भगत आणि जादूटोणावाले असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेच्याच माजी आमदाराने केली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

'रामदास कदम हे बंगाली बाबांना घेऊन फिरत असतात. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेता बनण्यासाठी दर अमावस्येला रामदास कदम भगतगिरी करायचा. जामगे येथील घराच्या गच्चीवर बंगाली बाबांच्या कोहळे कापायचा,' असा दावादेखील सूर्यकांत दळवी यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीआधी कोकणात शिवसेनेतच वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. 'रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करू नये, ज्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला त्या मतदार संघातून निवडणूक लढवावी माझ्या मतदार संघात मी आमदार नसलो तरी चालेल पण या मतदारसंघातला आणि पक्षासाठी त्याचं योगदान आहे असा कोणीही उमेदवार चालेल,' असंही सूर्यकांत दळवी म्हणाले आहेत.

'रामदास कदम यांनी आतापर्यंत चारवेळा पक्षाच्या विरोधात काम केलं आहे. याचे पुरावे माझ्याकडे आहेत,' असा दावाही सूर्यकांत दळवी यांनी केला. त्यामुळे दळवी यांच्या या गंभीर आरोपांना रामदास कदम नेमकं काय उत्तर देतात, हे पाहावं लागेल.                                                      


Find out more: