माझ्या सरकारचे 100 दिवस म्हणजे सिनेमाचा ट्रेलर आहे. पिक्चर तो अभी बाकी है, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यांनी शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना जाहीर केली.
झारखंड विधानभवनाच्या इमारतीचे उद्घाटन आणि विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी मोदी बोलत होते. ते म्हणाले, देशातील गरीबांच्या उत्थानासाठी हे सरकार कटीबध्द आहे. देशापेक्षा स्वत:ला मोठे समजणारे सध्या न्यायालयात हेलपाटे मारत आहेत.
गोरगरीबांना लुटणाऱ्यांना त्यांच्या योग्य जागी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आमचे सरकार योग्य दिशेने कार्यरत आहे, असे सांगून त्यांनी या सरकारचे 100 दिवस म्हणजे सिनेमाचा ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी है असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्याचा एकच कडकडाट केला.
पंतप्रधानांनी यावेळी किसान मानधन योजना आणि खुर्द व्यापारी दुकानदार स्वयंरोजगार योजना जाहीर केली. या योजनेनुसार दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
तर याच वयोगटातील प्राप्तीकर न भरणाऱ्या आणि दीडकोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांनाही पेन्शन योजना राबविण्यात येईल. दोन्ही योजनेत दरमहा 55 ते 220 रुपये (वयोमानानुसार) जमा करण्यात येतील. त्यात सरकार तेवढ्याच रकमेची भर घालेल. त्यातून महिना तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येईल. ही योजना एलआयसीकडून राबविण्यात येईल.