
विधी महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीवर वर्षभर बलात्कार केल्याचा आरोप असणारे भाजपा नेते आणि स्वामी चिन्मयानंद यांनी पुरावे गायब केल्याचा आरोप पिडीतेच्या वडिलांनी केला. या मुलीने तिच्या होस्टेलमध्ये चिन्मयानंद यांनी काही पुरावे जमा केले होते. ते आता आढळत नाहीत असे ते म्हणाले.
ही युवती रहात असणाऱ्या होस्टेलमध्ये तिने काही पुरावे जमा केले होते. त्यात चष्म्यातील कॅमेऱ्याने केलेले रेकॉर्डिंगही होते. मात्र विशेष तपास पथकाने (एसआयटी) या खोलीचे सील ही युवती आणि तिच्या वडिलांसमक्ष उघडले त्यावेळी हे पुरावे गायब झाल्याचे लक्षात आले, असे ते म्हणाले.
ही खोली सील करण्याची मागणी ही युवती गायब झाली तेव्हा केली होती. मात्र प्रत्यक्षात दोन दिवसांनी ही खोली सील केली. माझ्या मुलीने चिन्मयानंदांविरोधात अनेक पुरावे गोळा केले होते. त्यात तीने चष्म्यात बसवलेल्या कॅमेऱ्यातून केलेले चिन्मयानंदाचे चित्रण होते.
तो चष्मा गायब झाला आहे. ही बाब आम्ही विशेष पथकाच्या निदर्शनास आणली. त्याचा तपास करण्याची विनंती केली आहे. या युवतीच्या मैत्रिणीने पुरावे असणारा पेन ड्राइव्ह पोलिसांना दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.