मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. ही यात्रा सध्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पाऊस कमी पडल्याने सध्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. अशातच कुकडी कालव्याचे दरवाजे पुणे जिल्ह्यातील काही नेत्यांनी बंद केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अडवण्याचा इशारा आमदार राहुल जगताप यांनी दिला आहे.

याविषयी बोलताना राहुल जगताप यांनी माथा ते पायथा या नियमाप्रमाणे खालच्या भागात पाणी सूरु होते. आता श्रीगोंदा तालुक्यात पाणी सोडण्याची वेळ आली असताना काही नेत्यांच्या वादातून कालवा बंद करणे उचित नाही. एकतर पाऊस नाही सगळी आशा कुकडीच्या पाण्यावर अवलंबून आहे असं विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना बंद केलेला कालवा तातडीने सुरू करून श्रीगोंदा हद्दीतील सगळ्या वितरिका सुरू करा सीना, विसापूरचे फिडींग तातडीने सुरु करा अन्यथा मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना रस्त्यावर घेऊन अडविणार आहे असं आमदार राहुल जगताप यांनी सांगितले आहे.

दरम्यान, श्रीगोंदा तालुका हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. या भागात गेल्या ४-५ वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. अशातच कुकडी कालव्याचे पाणी अडवल्याने शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. त्यामुळे राहुल जगताप यांनी हे पूल उचलले आहे.


Find out more: