वृत्तपत्रांच्या हेडलाईन मॅनेजमेंटमधून बाहेर येत मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष द्याव असा सल्ला माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ मनमोहन सिंह यांनी नरेंद्र मोदींना दिला आहे. मोदी सरकारने अर्थव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत चिंताग्रस्त आहे हे मान्य करावं आणि त्यानुसार उपाय करावेत. ही प्रत्येक क्षेत्रातील मंदी आहे, असंही मनमोहन सिंह म्हणाले. याशिवाय त्यांनी मंदीवर मात करण्यासाठी सहा उपायही सुचवले आहेत.
जीएसटीमध्ये सुलभता, शेतीचं पुनरुज्जीवन, भांडवल निर्मिती, रोजगार केंद्रीत क्षेत्रावर भर, निर्यातीला प्रोत्साहन, पायाभूत सुविधा हे सहा उपाय मनमोहन सिंह यांनी मोदींना सुचवले आहेत. भारत ही रोखीवर चालणारी अर्थव्यवस्था आहे. या देशातला मोठा वर्ग आजही रोखीचेच व्यवहार करतो, पण नोटाबंदीनंतर बाजारात अभूतपूर्व चलन तुटवडा निर्माण झाला, असं मनमोहन सिंह यांनी सांगितलं आहे.
भारत सध्या एका मोठ्या संकटाकडे सापडला जात आहे. दिवसेंदिवस अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत खराब होत आहे. पण भयानक गोष्ट म्हणजे सरकारला या गोष्टींची जाणीव नाही. प्रदीर्घ मंदी ही चक्रिय आणि रचनात्मक स्वरुपाची आहे. त्यामुळे भारतात मंदी नाही हे नाकारणं आपल्याला सध्या परवडणारं नाही, असं मनमोहन सिंह म्हणाले.
देशाचा विकासदर दिवसेंदिवस घसरत आहे. विकास दर केवळ पाच टक्क्यांवरच राहिला आहे. या सर्व गोष्टी पाहून आम्हाला २००८ ची आठवण होत आहे. त्यावेळी कॉंग्रस सरकार होत आणि तेव्हाही अर्थव्यवस्था कोलमडली होती. त्यावेळी अर्थव्यवस्थेतील झालेली घसरण ही आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटामुळे झाली होती. त्या आव्हानांना स्वीकारून आम्ही एकत्रितरीत्या सामना केला होता. आणि व्यवस्थेला बळकटी आणण्याच्या दिशेने पावलं उचलली होती. असंही मनमोहन सिंग यांनी सांगितले.