भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजप प्रवेशावेळी बोलातना उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या कामाचे कौतुक केले.
लोकशाहीला मजबूत करण्याचे काम मोदी आणि शहांच्या नेतृत्वात भाजपा करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे आणि रामदास आठवले यांची उपस्थिती होती.
नरेंद्र मोदींच्या विचाराशी सहमत असल्याने आपण भाजपामध्ये प्रवेश केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच भाजपा सर्वधर्म समभावाने काम करत आहे. शिवाजी महाराजांचा विचार घेऊन भाजपा पुढे जात आहे, त्यामुळे विविध राज्यातून भाजपामध्ये प्रवेश केला जात आहे. प्रत्येक राज्यात होणाऱ्या भाजपाच्या प्रगतीचे कारण म्हणजे मोदी आणि शाह यांचे काम असल्याचेही ते म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी भाजपाने काश्मीरचा प्रलंबित असलेला प्रश्न सोडवल्याने प्रभावित झाल्याचे म्हटले. मी लहानपणापासून ऐकत आलेल्या काश्मीर प्रश्नावर मोंदी आणि शाह यांनी योग्य निर्णय घेतला आहे. भारत एकसंघ कसा राहिल यावर भाजपा काम करत असल्याचेही उदयनराजे यांनी म्हटले.