राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार उदयनराजे भोसले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उदयनराजे यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.
ज्यांना जायचं’ आहे ते जातील राष्ट्र्वादीकडे दुसरा उमेदवार लढायला तयार आहे, राजा गेला…पण प्रजा आमच्यासोबत आहे. सातारा आमचा बालेकिल्ला म्हणूनच राहील, म्हणत भुजबळ यांनी उदयनराजे यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती उदयनराजे भोसलेंनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला त्रास त्यांनी कधी सांगितला नाही, उदयनराजे यांनी संसदेत चांगले काम करावे.
१५ वर्षात त्यांना कोणताही त्रास झाल्याचं कधीच ऐकलं नाही. ते तसं कधीच बोलले नाही. मात्र त्यांना त्रास झालाय आता ते बोलले आहेत. त्यांना शुभेच्छा. कोणत्याही पक्षात गेले तरी ते चांगलंच काम करतील, असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे. तसेच साहेब !उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळ्यांना पाठिशी घालून जवळच्या माणसांना दुखावलं, काय मिळालं? असा सवाल शरद पवारांना केला आहे.