भारतीय जनता पार्टीसोबत राहून मी घेतलेला अनुभव छत्रपती उदयनराजे यांना सांगितला आहे. आता त्यांना अनुभव घ्यायचा असेल म्हणून ते भाजपात गेले असावेत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पुण्यात दिली. सध्याचा भाजप हा मोदी आणि फडणवीस यांचा आहे.

तो वाजपेयी आणि मुंडेचा पक्ष राहिलेला नाही अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात दाखल होतं आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर चहुबाजूने टीका होत आहे.

याविषयी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, 'चार-पाच दिवसांपूर्वी मी छत्रपती उदयनराजेंची भेट घेतली होती. त्यावेळी भाजपमध्ये जात असल्यास धोके तपासून पाहा. असा सल्ला त्यांना दिला होता. पण त्यांना स्वत: अनुभव घ्यायचा आहे.' पुण्यात झालेल्या बैठकीची माहिती शेट्टी यांनी दिली. तर यावेळी ते विधानसभा लढवणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणूक लढवण्यासाठी आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीला रामराम ठोकत उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपात प्रवेश केला. नवी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा, जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपात दाखल झाले आहे. 

शुक्रवारी संध्याकाळी उदयनराजे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नवी दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर आता उदयनराजेंना पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे.


Find out more: