मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर आता मिलिंद देवरा यांनी ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून, काँग्रेसने या पदावर माजी केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोझ यांचा मुलगा सलमान सोझ यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान, देवरा यांच्याकडे पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील एखादे मोठे पद येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.खासदार शशी थरूर हे ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रसचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या पश्चिम महाराष्ट्रातील समन्वयकपदी राजीव अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
26 जून रोजी राहुल गांधी यांची भेट घेतल्यावर देवरा यांनी या समितीच्या पदावरून कार्यमुक्त करण्याची विनंती त्यांच्याकडे केली होती. याबद्दल पक्षाचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे आणि के. ॠी. वेणूगोपाल यांनाही कळविण्यात आले होते.
या संदर्भात देवरा म्हणाले, की मी पक्षाच्या सांगण्यानुसार ते पद स्वीकारले होते; पण राहुल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मला त्या पदाचा राजीनामा द्यावा, असे वाटले. त्यानंतर या समितीसंदर्भात मी काही नावांची शिफारसही केली होती.
आता पक्षाला मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एखादी मोठी भूमिका निभावण्याचा माझा प्रयत्न असेल. देवरा हे राहुल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. 25 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीआधी पक्षाने त्यांच्याकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती.