मराठवाड्यात तिव्र दुष्काळी परिस्थिती आहे. जनावरांना चारा नाही, नागरिकांना पाणी नाही, शेतकरी आडचणीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत गुंग आहेत. त्यांची महाजनादेश यात्रा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत येऊन गेली.
मात्र, त्यांना दुष्काळाची आठवण झाली नाही असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला.मुख्यमंत्र्यांचे फक्त विधानसभा निवडणुकीवर लक्ष आहे, असा आरोपही त्यांनी केला. दुष्काळमुक्तीचा महासंग्राम मेळाव्यात शेट्टी आज बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, सरकार केवळ आश्वासनचा पाऊस पाडून जनतेची दिशाभूल करीत आहे. सरकार उद्योगपतीच्या हिताचे आहे. जिल्ह्य़ातील हजारो शेतकरी पिक विम्या पासून वंचित आहेत. सरकार विमा कंपनीवर कारवाई करण्याऐवजी पाठराखण करीत आहे.
विमा कंपनी मोठी लुट करीत असून समृद्धी महामार्गासाठी, बुलेट ट्रेनसाठी सरकार कडे पैसे आहेत. दुष्काळामुळे मराठवाडय़ातील नागरिक स्थलांतर करीत असताना सरकार कडे दुष्काळ निवारणासाठी पैसे नाहीत असेही शेट्टी म्हणाले.
सरकार आल्यानंतर शेतीला पाणी आणी शेती मालाला भाव देण्याचे आश्वासन पाळले नाही म्हणून सरकारची साथ सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढल्या पिढीच्या भविष्यासाठी व न्याय हक्कासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल असे आवाहन राजू शेट्टींनी केले. अध्यक्षस्थानी बाळासाहेब देशमुख होते. तर, डाॅ. प्रकाश पोकळे, रसिका ढगे, सत्तार पटेल, विजय जाधव जयजित शिंदे, कुलदीप करपे उपस्थित होते.