
मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासूनचा इतिहास आहे, राजे- रजवाडे हे सगळे आदिलशहाला सामील होते. बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार अशा अठरापगड जातीमधील शूरवीर मावळ्यांच्या जीवावर शिवाजी महाराजांनी मराठा राज्य स्थापन केले होते.
आताही राजे- रजवाडे हे सगळे पुन्हा आदिलशाहीत निघून गेलेत, ही लढाईसुद्धा हे मावळेच जिंकतील, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील आलाबाद येथे प्रचारानिमित्त केला.गेली तीस-पस्तीस वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनात जनतेचा सेवक म्हणूनच काम केले. मी तर जनतेचा भारवाहू हमालच आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी यावेळी केले.
समरजितसिंह घाटगे यांनी भाजपच्या उमेदवारी लढण्याचा निश्चय करीत आ. मुधीफ यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी राजघराण्यावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात महाजनादेश यात्रेवेळी कागलातून समरजितसिंह घाटगेच रिंगणात असतील असे जाहीर केले आहे. त्यामुळे कागल तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने काही दिवसांपूर्वीच छापे टाकले होते. मात्र हाती काहीच लागले नव्हते. अखेर हसन मुश्रीफ पुन्हा एकदा राजकारणांत सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँगे्रसमधील अनेक नेते सत्ताधारी भाजप-शिवसेनेला जवळ करतांना दिसून येत आहे. खुद्द शरद पवार यांनी मराठवाडयात राज्यव्यापी दौरा सुरू करून, पक्षाला आलेली मरगळ झटकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.