भाजपने जागा वाटपात शिवसेनेला शंभर जागा दिल्या तरी ते घेतील आणि युती करतील, नाहीतर पक्ष फुटेल, असे भाकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केले. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधत नाशिकमधील त्यांचे भाषण करपलेल्या वरणाला फोडणी दिल्यासारखे होते, अशी टीकाही त्यांनी केली. एका कार्यक्रमानिमित्त आव्हाड शुक्रवारी पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा राज्यात आल्यानंतर शरद पवार यांच्यावरच टीका करतात, याविषयी विचारले असता आव्हाड म्हणाले, पवारांचा मी वारकरी आहे, त्यांच्या विचारांची मी पूजा करतो.
ते राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहेत. नव्वदच्या दशकात बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हे शरद पवारांवर टीका करत होते, आता मोदी आणि शहा करतात. गेली 35 वर्षे पवार जागेवरच आहेत, मात्र त्यांच्यावर टीका करणारे खेळाडू बदलले आहेत.
शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत. वयाच्या 80 व्या वर्षीही ते तरुणाईला भुरळ पडेल, अशा पद्धतीने उत्साहाने राज्यभर फिरत आहेत, अशी तुलनाही आव्हाड यांनी केली. मोदी यांना पाकिस्तानची साखर चालते, कांदा चालतो, नवाज शरीफ यांची अचानक भेट, त्यांची बिर्याणी, पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना शुभेच्छा देतात, आणि इकडे येऊन पाकिस्तानला शिव्या देतात, असे उत्तर आव्हाड यांनी पवार यांनी केलेल्या पाकिस्तानच्या कौतुकवर्षावावर विचारलेल्या प्रश्नाला दिले.
पंतप्रधान महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी राज्यातील प्रश्नावर बोलणे अपेक्षित आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, बंद झालेले एक लाखापेक्षा जास्त कारखाने, या सगळ्या विषयांवर मोदी का बोलत नाहीत? असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला.
सांगली, कोल्हापूर या ठिकाणी एवढा मोठा महापूर येऊन गेला. मात्र, मोदींनी आपल्या भाषणात त्याचा साधा उल्लेखही केला नाही. या सर्वांवरून भाजपला सामान्य जनतेशी काही देणे घेणे नाही, निवडणूक जिंकणे, हा एकच त्यांचा उद्देश्य असल्याचे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली.