भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे पुढच्या मंत्रिमंडळात दिसावेत, अशी आपली इच्छा असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. खडसेंवर अन्याय झाला का? या प्रश्नाला मात्र पंकजा मुंडेंनी बगल दिली.
“एकनाथ खडसे पुढच्या मंत्रिमंडळात दिसावेत, अशा त्यांना शुभेच्छा देते, खडसे मंत्रिमंडळात असावेत, अशी माझी इच्छाही आहे” असं पंकजा मुंडे यांनी ‘बीबीसी मराठी’ला सांगितलं.
खडसेंवर अन्याय झालाय का, या प्रश्नाला मात्र पंकजा मुंडेंनी बगल दिली. “नाथाभाऊंवर अन्याय झाला की नाही, हे बोलण्याच्या रोलमध्ये मी नाही. पण त्यांच्या बाबतीतले विषय मार्गी लागावे आणि त्यांनी आमच्यासोबत यावं, असं मला वाटतं.” असं पंकजा म्हणाल्या.
2014 मधील विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सरकार सत्तेत निवडून आल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडे महसूलमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र काही महिन्यांतच एकनाथ खडसे यांच्यावर कथित जमिन व्यवहारात भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता.
त्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत खडसेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणात त्यांना क्लीन चीटही मिळाली होती. मात्र खडसेंची वर्णी मंत्रिमंडळात लागली नाही.