राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व अजित पवार यांच्यावर आज सक्तवसुली संचलनालया कडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. राज्य सहकारी बँकेत तब्बल 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर 22 ऑगस्ट रोजी या प्रकरणी पाच दिवसात संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते.
यानुसार, अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे सोबतच इतर तब्बल 50 अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या समोर येत असलेल्या माध्यमाच्या माहितीनुसार, या बड्या नेत्यांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजत आहे.
प्राप्त माहितीनुसार, 1961 साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता, अवैधरित्या कर्जवाटप केल्याने हा घोटाळा झाल्याचे सांगत बँकेतील पदाधिकाऱ्यांवर आरोप लागवण्यात आले होते. त्यावेळेस अजित पवार या बँकेच्या संचालक पदी होते.
या घोटाळ्याबाबत आरोप करणारी याचिका 2015 साली सुरिंदर अरोरा यांनी दाखल करताच रिझर्व्ह बँकेने ताबडतोब कारवाई करत या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते व या गोष्टीच्या चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर न्यायालयाने 26 ऑगस्ट रोजी या मंडळींवर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था काय होणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.