राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संकल्पनेनुसार प्रत्येक भारतीय हिंदूच असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी परदेशी पत्रकारांना संबोधीत करताना सांगितले आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्‍मिरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशातील पत्रकारांशी मोहन भागवत यांनी मंगळवारी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर संघाची भूमिका काय आहे, हे नेमकेपणाने स्पष्ट केले.

एकूण 50 परदेशी संस्थांमधील 80 पत्रकार या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. विविध विषयांवर यावेळी मोहन भागवत यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, कलम 370 मुळे खरंतर काश्‍मिरची नाळ भारताशी जोडली जाण्याला अडथळेच येत होते. त्यामुळे हे कलम रद्द केले जावे, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खूप पूर्वीची मागणी होती.

या राज्याचे विभाजन करून लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निर्णयालाही संघाने पाठिंबाच दिला असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे काश्‍मिरची नाळ उर्वरित भारताशी जोडण्याला मदतच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी हिंदूत्व हे विविधतेत एकात्मता असल्याचे सांगून त्यांनी प्रत्येक भारतीय संघासाठी हिंदूच असल्याचे स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची प्रक्रिया म्हणजे कोणालाही देशातून हाकलण्याची प्रक्रिया नाही. तर कोण या देशाचे नागरिक नाही, हे शोधून काढणे आहे, असे भैय्याजी जोशी यांनी सांगितल्याचे समजते. यावेळी जाती आधारित आरक्षण, समलैंगिकता या विषयावरील प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.


Find out more: