ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात नोटीस बजावली असून या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात आज(बुधवारी) निदर्शन आंदोलने केली जाणार आहेत. तर शरद पवारांचा गड अशी ओळख असलेले बारामती शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सूडबुद्धीने हे सरकार कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.
शरद पवारांचे नाव महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात सूडबुद्धीने घालण्यात आले आहे, शरद पवार यांनी गेल्या काही दिवसापासून सरकारच्या विरोधात रान उठवले आहे. जनतेचा त्यांच्या प्रचारसभांना मिळणारा प्रतिसाद पाहून सरकारने सूडबुद्धीने ईडीला हाताशी धरुन ही नोटीस पाठवली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
बुधवारी या पार्श्वभूमीवर बारामती बंद पुकारण्यात आला आहे. तर पुण्यातील मंडई येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शने केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी दिली.