महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कर्जांचे वितरण करताना २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याच्या आरोप प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह ७० जणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने गुन्हा दाखल केला आहे. सरकारने हे आरोप राजकीय सुड बुद्धीतून केले असल्यामुळे शरद पवारांच्या समर्थकांनी राज्यभर निदर्शने करण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्रच नाही तर शरद पवारांच्या समर्थनात देशभरातून आंदोन होत आहेत.
शरद पवारांवरील याच इडीच्या कारवाईच्या निषेधार्थ झारखंड येथील तमाड मतदार संघात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा व राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. शैलेश मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक व महिलांनी रास्ता रोको आंदोलन करत शरद पवारांना आपले समर्थन दर्शविले आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अजित पवार यांच्यासह इतर ७० जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टानेही उच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम ठरवला होता. त्यामुळे आता अजित पवारांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक प्रकरणातील ७० जणांविरोधात ईडी ने मनी लॉंड्रीगची केस दाखल केली आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना मोठा दणका बसला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, राज्य सहकारी को ऑप बँक घोटाळाप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता. तसेच पोलिसांनी योग्य चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अजित पवार यांच्यासह इतर ७० जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४०९,४०६, ४२०, ४६५, ४६७,४६८, ४९१, १२० (ब) यांसोबतच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्याने बँकेला फटका बसला.