माझ्याकडे आलेल्या पुराव्यानुसार शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा संबंध नाही. मी दिलेल्या पुराव्यांमध्ये शरद पवार यांचे नाव कसे आले हे आपल्याला माहित नाही. प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.
राळेगणसिध्दी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यामुळे या घोटाळा प्रकरणाचा पाठपुरावा करणारे अण्णा हजारे यांनीच पवारांना क्लीनचीट दिल्याचं बोलले जात आहे.
राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेच्या कर्ज वाटपात २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार प्रथम पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तीन दिवसांपूर्वी ईडीने या प्रकरणाची दाखल घेत गुन्हा दाखल केला. यामध्ये शरद पवार यांचे देखील नाव समाविष्ट आहे. पवार यांच्यावर गुन्हा दाखल होताच राज्यभरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
राज्य सहकारी बँकेकडून अनेक सहकारी कारखान्यांना कर्ज वाटप करण्यात आले होते. परंतु कर्जाची परतफेड न केल्याने कारखान्यांचा लिलाव काढण्यात आला. बॅंकांनी हे कारखाने कवडीमोल भावाने खासगी कंपन्यांना विकले. कारखाने आजारी पडले की पाडले गेले, अशी शंका आहे. असे अण्णा हजारे म्हणाले.
दरम्यान, माझ्याकडे आलेल्या पुराव्यानुसार शरद पवार यांचा या प्रकरणात कुठलाही संबंध नाही. परंतू, अजित पवार यांचे या प्रकरणात नाव आहे. ईडीने शरद पवार यांचे नाव कसे काय घेतले हे मला माहित नाही. सर्वकाही चौकशी दरम्यान स्पष्ट होईल, असही अण्णांनी सांगितले आहे.