राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ED office) यांनी पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब केला. खुद्द पवारांनी माध्यमांना याबाबतची माहिती दिली.

कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी म्हणून मी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब करतोय, असं पवार म्हणाले. तसेच, पवारांनी यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि शिवसेनेचे या प्रकरणात त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल आभारही मानले.

“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते आणि या प्रकरणी आम्हाला साथ देणारे सर्व लोक यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही अत्याचार अन्यायाविरुद्ध भूमिका घेतली. महाराष्ट्रातील सामुहिक शक्ती कशी एकत्रित होते याचं प्रदर्शन तुम्ही घडवून आणलं.

यामध्ये राहुल गांधी, मनमोहन सिंग आणि वरिष्ठ राष्ट्रीय नेत्यांनी सुद्धा आम्हाला संपर्क साधून या प्रकरणी आम्ही तुमच्यासोबत असल्याची भूमिका मांडली. त्यांचेही मी आभार मानतो, तसेच शिवसेनेनेही यात सहभाग घेतला त्यांचेही मी आभार मानतो”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांच्या समर्थनार्थ राहुल गांधींनीही ट्वीट केलं. यामध्ये त्यांनी भापज सरकारवर घणाघात केला. “भाजपकडून सूडभावनेने लक्ष्य केलेले शरद पवार हे आणखी एक विरोधी पक्षनेते आहेत, महाराष्ट्र निवडणुकीच्या महिनाभरआधी कारवाई, सरकारच्या सूडभावनेचा निषेध”, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं.            

Find out more: