भारताच्या सागरी किनारी प्रदेशात पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून एखादी मोठा घटना घडवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सागरी सुरक्षेसाठी आपण वचनबद्ध आहोत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. भारताच्या सागरी किनाऱ्यावर पाकिस्तान हा दहशतवाद्यांच्या मदतीने हल्ला करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केरळमधील कोल्लममध्ये आयोजितल एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की जे कुणी भारताची सुरक्षा धोक्यात आणतील, त्यांना आम्ही सुखाने राहू देणार नाही. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोट येथील दहशतवादी छावणीवर करण्यात आलेल्या हल्ल्यांच्या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केले.
ते म्हणाले, आपली सागरी सुरक्षा पुरेशी बळकट आहे. पुलवामा हल्ला झाला, त्या वेळी जवानांनी जे बलिदान दिले ते देशातील कुणीही व्यक्ती विसरणार नाही. त्यानंतर आम्ही पाकिस्तानात घुसून बालाकोट येथे हवाई हल्ले केले. जर आम्हाला कुणी धोक्यात आणले, तर त्यांना आम्ही सुखाने राहू देणार नाही. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी समाजाने भक्कमपणे उभे राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.