भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या या यादीतून जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव वगळण्यात आले आहे. एकनाथ खडसे हे आघाडी सरकारच्या काळात विरोधीपक्षनेते होते. त्यांनी पडत्या काळात पक्षाला उभारी देण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांचे यादीत नाव नसणे हे मोठ दुर्दैव आहे. त्यामुळे खडसेंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
उमेदवारांच्या यादीत नाव नसतानाही खडसेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी जळगावमधील मुक्तीताईनगर विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. यानंतर बोलताना त्यांनी गेली चाळीस वर्ष आपण पक्षाशी प्रामाणिक राहिलो.
इतर पक्षातून अनेकवेळा मंत्री पदापासून वेगवेगळी प्रलोभने आपल्याला आली. मात्र आपण पक्षाची बांधिलकी कधीही सोडली नाही. हे सगळं करून झाल्यानंतर बाहेरच्यांच्या आरोपांवरून कोणतीही चूक नसताना आपल्याला तीन वर्षापासून मंत्री पदावरून दूर केलं गेलं असं खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी पुढे बोलताना ‘पहिले ज्यावेळी शिवसेना-भाजपचा मुख्यमंत्री व्हायचा त्यावेळी युतीचा मुख्यमंत्री अशी ओळख असायची मात्र आता ‘आपला’ मुख्यमंत्री पाच वर्षासाठी राहिला. या काळात सरकारमधील एकही मंत्री माझ्या नजरेला नजर देऊ शकला नाही, असेही एकनाथ खडसे म्हणाले.
जे वाईट आहे त्यावर प्रहार केला. समोर कोण आहे त्याची कधीच चिंता केली नाही, असेही खडसे यावेळी म्हणाले. पुढे बोलताना खडसे यांनी ‘आपल्याला तिकीट मिळो अथवा न मिळो जनता आपल्या पाठीशी आहे. गेली चाळीस वर्ष जनतेने साथ दिल्यामुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचलो असल्याने सांगत खडसे यांनी जनतेचे आभार मानले. पुढील काळात देखील साथ जनतेने द्यावी असं आवाहन त्यांनी केले. तसेच प्रामाणिकपने काम करून आपल्याला कामाची पावती मिळाली नाही असंही ते म्हणाले.