काँग्रेसचे उमेदवार डी.पी.सावंत यांनी बुधवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करून प्रचाराचा शुभारंभ केला. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सावंत यांनी राज काॅर्नर चौकातून स्टेडियमपर्यंत रॅली काढली. रॅलीचे रूपांतर इंदिरा गांधी मैदानावर जाहीर सभेत झाले. या सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
सभेत बोलताना अशोक चव्हाणांनी भाजप-शिवसेनेवर घणाघाती टीका केली. आघाडी सरकारच्या काळात ज्यांच्यावर काही आरोप करण्यात आले त्यांना या सरकारने तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातले काही जण भाजपत गेल्याने ते शुद्ध झाले. परंतु देशात हजारो कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करणाऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. घोटाळेबाज बँकांना बुडवून परदेशात गेले. त्यांच्यामुळे बँका
अडचणीत आल्या.
सहकार क्षेत्र अडचणीत आले. त्यामुळे आता नारा बदलला पाहिजेत. 'तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से' असा नारा या वेळी अशोक चव्हाणांनी दिला. एकमेकांना शिव्या घालणारे आता गळ्यात गळे घालून निवडणूक लढवत असल्याची टीकाही चव्हाण यांनी भाजप-सेनेवर केली.