मेकअप कितीही चांगला केला तरीही तुमचा खरा चेहरा समोर येणारच असं म्हणत अभिनेता आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी भाजपावर टीका केली. विधानसभा निवडणुकीसाठी आज अमित देशमुख आणि धीरज देशमुख या दोघांनी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.
त्यावेळी झालेल्या भाषणात रितेश देशमुख यांनी भाजपा आणि शिवसेनेवर निशाणा साधला. लातुरात जेव्हा अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे अर्ज भरण्यासाठी आले त्यावेळी हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
” सध्याचा काळ कठीण आहे, तुम्ही उभं राहणार का निवडणुकीला? असं मला एकाने विचारलं तेव्हा मी सांगितलं मी लातूरचा आहे आणि अडचणींचा काळ असला म्हणून काय झालं? कोणतीही गोष्ट आम्ही सहज मिळेल अशी अपेक्षा करत नाही.
मध्यंतरी कुणीतरी बातमी केली होती की मला माहिम विधानसभेतून तिकिट देण्यात येणार आहे. अहो माझा जन्म लातूरचा आहे, मी मराठवाड्याचा आहे. माझा शेवटही इथेच होणार” असं रितेश देशमुख यांनी म्हणताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
आजची सभा ही तर मला विजयाची सभा वाटते आहे. २१ तारखेला भैय्यांना मतदान करणार हा नवीन मतदाराचा विश्वास आहे. पुढील काळात फेकाफेकी सुरु होणार, विचित्र फूल दिसेल पण ते सगळं डिलिट करा. मेकअप कितीही चांगला असला तरीही तो खरा चेहरा लपवू शकत नाही. सत्ताधाऱ्यांनो आता तुम्ही काळजी घ्या, अशा शब्दात रितेश देशमुख यांनी भाजपा सेनेवर टीका केली.
लातूरमध्ये आपली ताकद काय आहे ते विरोधकांनी पाहिलं आणि ओळखलं. त्यामुळे इथे विरोधकांनी उमेदवारच दिला नाही असा टोलाही रितेश देशमुख यांनी लगावला. इतकंच नाही तर लातूर शहर आणि ग्रामीण मध्ये काँग्रेसलाच निवडून आणा असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं.