गेल्या 5 वर्षांमध्ये मतदार संघामध्ये भाजपची ताकद वाढली आहे. 40 हजार नागरिक भाजपचे सदस्य झाले आहेत. पक्षात दररोज प्रवेश होत आहे. मतदारसंघाच्या विकास करण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची कामे करण्यात आली आहेत. वडगावशेरीच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. मतदारसंघातील भाजप महायुतीची ताकद आणि विकासकामाच्या जोरावर ही निवडणूक जिंकणार, असा विश्वास आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.
वडगावशेरीचे आमदार जगदीश मुळीक यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वडगावशेरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी खासदार गिरीश बापट उपस्थित होते. मुळीक यांनी सकाळी रॅली काढली. यामध्ये भाजप, शिवसेना, रासप आणि आरपीआयचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वडगावशेरी मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या माध्यमातून 2 हजार कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. वनाज ते रामवाडी मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. वाघोलीपर्यंत मेट्रोचा प्रस्ताव सादर केला आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 4 उड्डाणपूल आणि नदीपात्रावरील पूल करण्याचे नियोजन केले. भामा आसखेड योजनेचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, असे मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण केले आहे. वडगावशेरीची वाटचाल टॅंकरमुक्तीकडे चालू आहे. डॉ. आंबेडकर शासकीय वसतिगृहाचे निर्माण, एमएनजीएलद्वारे हजारो घरांमध्ये पाइपलाइनद्वारे गॅस पुरवला जात आहे.
हरित वडगावशेरीसाठी राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, विश्रांतवाडीतील पाम उद्यान, खराडीतील उद्यान, वडगाव शिंदे येथे वनपर्यंटन केंद्र करत आहे. तारकेश्वर देवस्थानला “क’ दर्जाचे पर्यटनस्थळ घोषीत केले आहे. लोहगाव येथील हरीण तळाचा विकास करण्यासाठी जवळपास 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे मुळीक यांनी सांगितले. नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी मतदारसंघात ओपन जीम तयार केली आहे.