पवार खानदानाचा वारसदार रोहित कि पार्थ याचा निर्णय मी नव्हे तर महाराष्ट्रातील जनता घेईल, असे सांगत पुढच्या पिढीच्या बाबत विचारलेल्या प्रश्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बगल दिली. मात्र त्याचवेळी राज्यातील जनतेला बदल हवा आहे, असे त्यांनीं स्पष्ट केले.
एका वृत्तवाहिनीला इडल्या मुलाखतीत पवार बोलत होते. यावेळी त्यांना पार्थ आणि रोहित यांच्यापैकी पवार घराण्याचा पुढील वारसदार कोण, असे विचारले. त्यावेळी पवार म्हणाले ज्याला लोकांचा पाठिंबा मिळेल आणि लोक ज्याला पुढे आणतील, तोच वारसदार ठरेल.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लोक बदलाच्या विचारात आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून सत्ता, संपत्ती आणि साधनांचा प्रचंड गैरवापर सुरु आहे. परंतु, महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच बदल हवा आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
आमच्या घरात कोणताही कलह नसल्याचे सांगून पवार म्हणाले, ‘ईडी’ने माझ्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे अजित पवार भावूक झाले होते. त्यातून त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यासाठी कोणताही गृहकलह कारणीभूत नाही. पवार घराणे हे एका मताने वागणारे आहे.