आज राज्यात फिरताना तरुणांचा पाठिंबा मिळत आहे, हे खरे आहे. असे असले तरी महाराष्ट्रात तरुणांच्या नवीन नेतृत्वाची फळी करायची आहे. त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. पुढील दहा ते वीस वर्षांत युवा तरुणांची फळी तयार करायची आहे. त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.
त्यामुळे नवीन नेतृत्व उभे करण्यासाठी कामाला लागलो आहे. त्यादृष्टीने मी पाऊल उचलले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'झी २४ तास'ला खास मुलाखतीत दिली.
'झी २४ तास'चे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' यावर भाष्य करताना ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकांशी संवाद साधण्यासाठी 'शिवस्वराज्य यात्रा' काढली. खासदार अमोल कोल्हे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली.
तरुणांच्या हाती नेतृत्व आले पाहिजे. त्यांना वाव मिळाला पाहिजे. त्याची आज गरज आहे. त्यादृष्टीने माझा विचार सुरु आहे. त्यासाठीच युवा नेतृत्वाची फळी उभी करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने काम सुरु आहे, असे सांगताना त्यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे उदाहरण दिले. १९६५-६६ मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी एका भाषणात सांगितले होते की, पुढील वीस वर्षांत मला तरुणांची पिढी कार्यरत करायची आहे.
त्यामुळे सभेत जी पुढे तरुण पिढी बसली आहे. त्यांना पुढे घेऊन जायचे आहे. त्यांनी तरुणांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे मला तरुणपणी संधी मिळाली. आता तिच जबाबदारी माझ्यावर आहे. राज्यात तरुण पिढीला पुढे आणायचे आहे. त्यांचे नेतृत्व उभे करायचे आहे. त्यामुळे मी हे काम हाती घेतले आहे, असे पवार म्हणालेत.