माझ्यावर भाजपने अन्याय केला असे मी कदापि म्हणणार नाही, तर भाजपने मला मोठा दगा दिला आहे, भाजप हा दगलबाजांचा पक्ष आहे, असा गंभीर आरोप आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप साेडलेले नेते अनिल गोटे (धुळे) यांनी केला. तसेच आपला लोकसंग्राम पक्ष या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सामील असल्याचे गोटे यांनी सांगितले.
सोमवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. या वेळी व्यासपीठावर घटक पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आमदार गोटे उपस्थित होते. 'आघाडी सरकारवर विधिमंडळात जोरदार टीका करणारे तुम्ही आता कसे काय सामील झालात?', असा प्रश्न गोटे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी 'काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील जर भाजपत जाऊ शकतात, तर अनिल गोटेसुद्धा भाजपातून महाआघाडीत येऊ शकतो,' असे उत्तर दिले.
माझ्यावर भाजपने अन्याय केला वगैरे मी म्हणणार नाही. तर मला भाजपने दगा दिला आहे. दगलबाज भाजपला आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठीच आपण धुळे शहरातून लोकसंग्रामच्या तिकिटावर उभे आहोत, असे गोटे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष महाआघाडीत सहभागी असल्याची घोषणा केली. तसेच गोटे निवडणूक लढवत असलेल्या धुळे शहर विधानसभा मतदारसंघात महाआघाडीचा त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
११ पक्षांची आघाडी
काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी, बहुजन सोशलिस्ट रिपब्लिकन पक्ष आणि लोकसंग्राम असे ११ पक्ष विधानसभा निवडणुकीत एकत्र आले आहेत. संयुक्त पुराेगामी महाआघाडी असे या आघाडीचे नामकरण करण्यात आले आहे.