लोकसभा पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी तीन महिन्यांपूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात असे काय घडले की, त्यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन जनतेवर पुन्हा ही निवडणूक लादली.

त्याचे सर्वांनाच पटेल, असे कारण त्यांनी सांगावे, मी निवडणुकीतून माघार घेईन, असे आव्हान महाआघाडीचे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी दिले. लोकसभेसाठी मला व पाटण विधानसभा मतदारसंघात सत्यजितसिंह पाटणकर यांना मत म्हणजे, आपले नेते शरद पवार यांना मत, हा विचार करून परिवर्तन घडवा, असे आवाहनही त्यांनी केले.

श्रीनिवास पाटील व सत्यजितसिंह पाटणकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ म्हावशी, ता. पाटण येथे करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्य प्रमुख सारंग पाटील, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती राजेश पवार, अर्जुनसिंह पाटणकर, जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव, पंचायत समिती सदस्य उज्ज्वला लोहार, नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, ऍड. अविनाश जानुगडे, दीपकसिंह पाटणकर, शंकरराव जाधव, राजाभाऊ काळे, सुभाषराव पवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.श्रीनिवास पाटील म्हणाले, विक्रमसिंह पाटणकर यांच्या दूरदृष्टीमुळे पाटण मतदारसंघात आजवर विकास झाला. तोच वारसा सत्यजितसिंह पाटणकर पुढे नेत असून गेल्या काही वर्षात खुंटलेला विकास मार्गी लावण्यासाठी त्यांना आमदार व मला खासदार करा.

विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने केवळ जाहिराती केल्या आहेत. टीव्ही सुरू केला की, मोदीबाबा लगेच हजर. ही मंडळी कोणालाही न्याय देऊ शकली नाही. आता तुमच्या जीवनात आर्थिक, सामाजिक प्रगती करायची असेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही.

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, म्हावशी येथूनच 1983 साली परिवर्तनाची मशाल पेटली होती. 2019 लाही त्याची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. गेल्या पाच वर्षांत आपण काय केले, हे सांगण्यापेक्षा विरोधक दादांनी काय केले, असा प्रश्‍न विचारतात. दादांनी काही केले नसते, तर जनतेने त्यांना सहा वेळा आमदार केले नसते. आता अपयशी विद्यमान आमदारांना घरी बसवा. येथे आपला नवीन साखर कारखाना होतोय. अनेक प्रकल्प उभारायचे आहेत. सरपंच शंकर घाडगे यांनी स्वागत केले. दिनकरराव घाडगे यांनी प्रास्ताविक केले. दीपक घाडगे यांनी आभार मानले.


Find out more: