मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पुण्यातील पहिली प्रचारसभा बुधवारी अचानक पडलेल्या वादळी पावसामुळे ऐनवेळी रद्द करावी लागली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला होता. मात्र, सभा रद्द झाल्याचे दिसताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली.
दरम्यान, आज राज ठाकरे मराठा कॉलनी, पटेल नगर सांताक्रूझ पू.मुंबई येथून प्रचाराचा नारळ फोडला आहे. आणि त्यानंतर गोरेगाव येथे राज यांची दुसरी सभा झाली.
राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे –
- शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांनी आरोळी ठोकली होती की आम्ही राजीनामा देऊ, आमची एवढी वर्ष सत्तेत सडली, आणि आमची १२४ जागांवर अडली. ह्या असल्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकारला वठणीवर आणायला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे आणि त्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे.
- मी त्यांना एकच गोष्ट सांगून आलोय ह्या अशा कितीही चौकश्या केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही” ईडी चौकशीनंतर.
- ह्या बुलेट ट्रेनसाठी आदिवासींच्या जमिनी घेतल्या जात आहेत, का? ह्या बुलेट ट्रेनचा कोणाला उपयोग आहे? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची जखम पुन्हा जिवंत करायचा हा प्रयत्न आहे का?
- जपानकडून कर्ज घेऊन १ लाख १० हजार कोटींचा बुलेट ट्रेन प्रकल्प कोणासाठी उभारताय? काकोडकर समितीचा अहवाल आहे की देशातील रेल्वेचं जाळं सुधारायला फक्त १ लक्ष कोटींची गरज आहे, त्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत पण निरुपयोगी बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत?
- आज महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरमधल्या ३७० कलमबद्दल बोलत आहेत; ३७० कलम काढलं ह्या बद्दल अभिनंदन पण ह्याचा आमच्या महाराष्ट्राच्या निवडणुकींशी काय संबंध? आमच्या प्रश्नांविषयी कधी बोलणार? आमच्या बेरोजगार तरुणांविषयी आणि शेतकऱ्यांविषयी कधी बोलणार?
- मी माझ्या पहिल्या सभेत ब्ल्यू प्रिंटचा उल्लेख केला. मला कायम विचारलं जायचं की ब्ल्यू प्रिंट कधी आणणार? जेव्हा मी जेव्हा ब्ल्यू प्रिंट समोर आणली तेव्हा एकाही पत्रकाराने पाहिली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी मला पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारलं तुमच्या ब्ल्यू फिल्मचं काय झालं? ब्ल्यूफिल्म? काय बोलायचं? पण आता वाटतं आहे की ब्ल्यू प्रिंटऐवजी ब्लू फिल्म काढली असती तर बरं झालं असतं लोकांनी ती पाहिली तरी असती. पत्रकारांनी वारंवार पाहिली असती असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.