कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा सल्लागार बनण्यास पक्षाचे नेते आणि वाराणसीचे माजी खासदार राजेश मिश्रा यांनी नकार दिला आहे. कॉंग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश कॉंग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेसने उत्तरप्रदेशची जबाबदारी प्रियांका यांच्यावर सोपवली. मात्र, पक्षाची नामुष्कीजनक पीछेहाट त्या थोपवू शकल्या नाहीत.

आता उत्तरप्रदेशात पक्ष संघटना मजबूत करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन कॉंग्रेस पक्ष पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यातून पक्षाने उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांच्या जागी अजयकुमार लल्लू यांची नियुक्ती केली.

त्यांच्या दिमतीत नवे 4 उपाध्यक्ष आणि 12 सरचिटणीस देण्यात आले. त्याशिवाय, प्रियांका यांच्या मदतीसाठी 18 सदस्यीय सल्लागार परिषद स्थापन करण्यात आली. त्या परिषदेत मिश्रा यांना स्थान देण्यात आले. मात्र, सल्ला देण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगत मिश्रा यांनी परिषदेचे सदस्यत्व स्वीकारण्यास नकार दर्शवला आहे.

पत्रकारांनी त्याबाबत विचारल्यावर मिश्रा यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. संबंधित विषय हा पक्षाचा अंतर्गत मामला आहे. प्रियांका किंवा राहुल गांधी यांनी विचारल्यास त्यांच्यापुढे मी भूमिका मांडेन, असे त्यांनी म्हटले.                                                                         

Find out more: