
नागपुर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरात सभा घेऊन देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. नागपूरात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी नागपूरला क्राईम सिटी अशी नवी ओळख दिली. छत्रपतींचे स्मारक, इंदू मिलवरचे बाबासाहेबांचे स्मारक अशा सगळ्या प्रकल्पांची कामं रखडली आहेत. एक विटही रचली गेली नाही. काम तर काही केलं नाही मात्र मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवलं.
आता तुमचे काय हाल करेल याचा विचार करा आणि आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं. ते पुढे म्हणाले, राज्यात कुठल्याही रस्त्याने गेलात तर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. आम्ही आघाडीच्या काळात खड्डे’मुक्त’ राज्य घडवण्याचा संकल्प केला होता, मात्र या सरकारने खड्डे’युक्त’ राज्य घडवण्याचा निर्धार केलाय. अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले. पण सरकारला लोकांच्या जीवाची पर्वा नाही.
शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला या सरकारची ना आहे. आपल्या राज्यात कांद्याला चांगला भाव मिळत असताना या सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली आणि परदेशी कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकरी उध्वस्त झालाय.
या भागात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांनी पीकविमा काढून देखील त्यांना पैसे मिळाले नाहीत. सरसकट कर्जमाफीची घोषणा यांनी केली पण अजूनदेखील 70 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची या सरकारची इच्छा नाही. मात्र देशाचे अर्थमंत्री ८० हजार कोटींची गुंतवणूक कॉर्पोरेट क्षेत्रात करण्याचा निर्णय घेतात. याचा अर्थ या सरकारला शेतकऱ्यांची फिकीर नाही, फक्त उद्योगपतींची काळजी आहे.
राज्याचे वातावरण बिघडवण्याचे काम ज्यांनी केले त्यांच्या हातून सत्ता काढून घेण्याचे काम या निवडणुकीत करायचे आहे. एकेकाळी आपल्या राज्याची ओळख धनिक राज्य अशी होती. पण मागील 5 वर्षांत या सरकारने राज्यावर 4 लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. राज्याचा विकास किती केला यावर न बोललेलंच बरं अशी टीकाही त्यांनी केली.