सोलापूर : कुस्ती पैलवानांसोबत सोबत होते अशांसोबत नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.

मुख्यमंत्री म्हणतात लढाईसाठी आम्ही तयार आहोत, मात्र समोर कुस्तीला कोणी नाही. पण कुस्ती पैलवानांसोबत होते, अशांसोबत होत नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. सोलापूरातील बार्शी येथे शुक्रवारी झालेल्या सभेत ते बोलत होते.

हे सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही. लष्कराने केलेल्या कारवाईचे श्रेयही लाटते. अशा फसव्या सरकारला सत्तेवरून खाली खेचायचे काम आपल्याला करायचे आहे, असेही पवार म्हणाले.

या सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली. शेतकरी आत्महत्या वाढल्या. रस्त्यातील खड्डे वाढले. आघाडी सरकारच्या काळात हे राज्य खड्डेमुक्त करण्याचा संकल्प केला होता या सरकारने हे राज्यच खड्ड्यात घातले आहे. पाच वर्ष सत्तेत असूनही यांना उमेदवार आयात करावे लागतात, अशी टीका हि पवार यांनी केली.

शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर निवडणूक लढवत आहेत.                                                                              


Find out more: