ओतूर- शिवसेना हा पक्ष लाचारांचा पक्ष आहे. या पक्षाला निवडणूक आली की राम मंदिर आठवते. युती सरकारने गेल्या पाच वर्षांत नुसत्या झोपाच काढल्या आहेत. महाराष्ट्रात आता मोदींची लाट ओसरली असून या निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचेच सरकार येणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिव, स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांनी केले.

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांची प्रचारानिमित्त राजुरी येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष व आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे, अतुल बेनके,कृषी बाजार समीतीचे सभापती संजय काळे, जिल्हा परिषदेचे सदस्य व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, शरद लेंडे, मोहित ढमाले, गणपत फुलवडे, रामुदादा बोरचटे, पंचायत समीतीचे माजी सभापती दीपक औटी, अनंत चौगुले, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुरेखा वेठेकर, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रवादीचे हाजी हर्षद पठाण, अकबर पठाण, मोहन हाडवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले की, कुकडी प्रकल्पातील पाच धरणांपैकी पिंपळगाव जोगे धरणाचे कार्यालय नगर जिल्ह्यातील आळकुटीला कसे काय गेले होते. याचा विचार सर्व शेतकऱ्यांनी केला पाहिजे. ते कार्यालय परत आणण्याचे काम अतुल बेनके यांनी केले आहे.

  • गेल्या पाच वर्षांत लोकप्रतिनिधीने अनेक आश्‍वासने दिली. मला निवडून द्या. मी आणे पठारावर एमआयडीसी आणतो. पठारावर पाण्याची कायम स्वरुपाची सोय करेल. त्यांनी फक्‍त आश्‍वासनेच दिली आहेत. याउलट मी सत्तेत नसताना देखील सुमारे दोन हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. हक्‍काच्या पाण्यासाठी आंदोलने केली.
  • – अतुल देशमुख, उमेदवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जुन्नर विधानसभा मतदारसंघ
  • सध्याच्या सरकारने राज्यांवर कर्जाचा मोठा डोंगर करून ठेवला असताना जुन्नर तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधीने 2 हजार 247 कोटींची विकासकामे झाली असे सांगितले. तालुक्‍यात पहिले तर विकासकामे दिसत नाहीत. मग ती फक्‍त कागदावरच झाली आहेत काय, असा सवाल करून विद्यमान आमदारांना पाण्याचे नियोजन करता आले नाही. पूर्वी पाच आवर्तने मिळत होती. ती आता दोनवर आली आहेत. परत निवडून आले तर एकवर येईल म्हणून तालुक्‍यातील जनतेला पाण्याचा हक्‍क कायम ठेवायचा असेल तर अतुल बेनके यांना विजयी करा.
  • – जयंत पाटील, प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस


Find out more: