मुंबई: राज ठाकरेंनी दहिसरमधील प्रचारसभेत शिवसेनेवर तोफ डागली. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनामा नाट्यावर राज ठाकरेंनी टीका केली. पाच वर्षात राजीनामे देता आले नाहीत, सरकारमध्ये राहून नुसत्या धमक्या दिल्या. पैशाचं काम अडलं की केवळ आर्थिक हितसंबंधांसाठी राजीनाम्याची धमकी शिवसेनेच्या मंत्र्यांकडून दिली गेली, असा आरोप राज ठाकरेंनी केला.
शिवसेना-भाजपच्या विकासकामांच्या जाहिरातींवरही राज ठाकरे यांनी भाष्य केले. शिवसेना-भाजपच्या जाहिरातींमध्ये सगळीकडे लिहिलंय ‘हीच ती वेळ’, म्हणजे गेली पाच वर्षे नव्हता का यांना वेळ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.लोकांच्या आयुष्यभराची ठेवी कशा बुडू शकतात? या बॅंकेच्या वरिष्ठ पातळीवर जे आहेत, ते शिवसेना-भाजपाचेच लोक बसलेले आहेत.
तुमचे पैसे बुडवल्यानंतर आता त्यांनी हातवर केले आहेत. आरबीयचा काही संबंध नाही, अस सांगतात तर मग या बॅंकांना मान्यता कशी काय दिली जाते? असा सवालही त्यांनी केला. तसेच, देश चालवता येत नाही म्हणून मोदी सरकारने आरबीआयकडून एक लाख 70 हजार कोटी रुपये घेतले होते, असे त्यांनी सांगितले.
नोटाबंदीच्या निर्णयावरून टीका करत म्हटले की, या चुकीच्या निर्णयामुळेच आज दोन ते तीन कोटी लोकांचा रोजगार गेला आहे. जर सरकार तुमच्या हातात असेल, तर मग उद्योग-धंदे का बंद पडत आहेत? हजारो लोक जर बेरोजगार झाले तर त्यांनी करायचं काय? हा कोणता कारभार आहे. शेतकरी आत्महत्या रोखू अस सांगणाऱ्या या सरकारच्या पाच वर्षात कार्यकाळात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
आरेतील झाडं कापण्यावरून बोलताना राज म्हणाले की, न्यायालयावर विश्वास ठेवायचा तरी कसा? एका रात्रीत कसा काय निर्णय होऊ शकतो. एका रात्रीतून 2700 झाडं तोडण्यात आली. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख म्हणतात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तिथं जंगल घोषित करू. तिथं काय गवत लावणार का? त्यांच्या जाहीरनाम्यात आरेचा मुद्दा देखील हे सांगत तुम्हाला वेडं बनवल्या जात आहे, असेही ते उपस्थितांना उद्देशुन म्हणाले.