काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी जेथे जातात तेथे काँग्रेसचा पराभव होतो. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात सभा घेतली हे भाजपच्या दृष्टीन चांगलेच आहे, अशी खोचक टिप्पणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतीच केली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आलेल्या असताना त्यांनी हा टोमणा मारला.
काँग्रेस नेत्यांना त्यांची ही टिप्पणी चांगलीच झोंबली असणार, कारण स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात पराभव केलेला. त्यामुळे त्यांनी राहुलची खिल्ली उडवणे याला खास महत्त्व आहे.
तरीही इराणी यांच्या वक्तव्यात वास्तवाचा अंश आहेच. काँग्रेसची सूत्रे हाती घेऊन राहुलना एका वर्षापेक्षा जास्त काळ झाला. मात्र या काळात ते पक्षाला कुठलाही मोठा विजय मिळवून देऊ शकले नाहीत. त्यामुळे अपयशी नेता म्हणून त्यांच्यावर शिक्का बसला. विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर तर राहुल यांनी या अपयशाचा ठपका एवढा मनावर घेतला, की त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाच दिला. गेली चार महिने राहुल यांनी काँग्रेस पक्षाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. त्यामुळे त्यांचे अनेक समर्थक नाराज असून ते अधूनमधून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत असतात.
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार संजय निरुपम हे अशाच नेत्यांपैकी एक. राहुल गांधी यांचे विश्वासू नेते म्हणून ते ओळखले जातात. ते तब्बल पाच वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. परंतु सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना कोणी विचारत नाहीये. त्यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला तरीही त्यांची मनधरणी करण्यासाठी कोणी गेले नाही. त्यामुळे निरुपम यांनी आणखी एक अस्त्र आपल्या भात्यातून काढले आहे. राहुल यांना अयशस्वी करण्यासाठी पक्षातीलच काही ज्येष्ठ नेत्यांनी कारस्थान रचले, असा आरोप त्यांनी केला आहे.
एका प्रमुख हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत निरुपम यांनी हा आरोप केला आहे. काँग्रेसचा 2014 मध्ये पराभव झाल्यानंतर राहुल गांधी काँग्रेसमध्ये केंद्रस्थानी आले आणि त्यांनी पक्षाच्या बाबतीत निर्णय घ्यायला सुरुवात केली. काँग्रेसच्या दृष्टीने हे एक नवे युग होते. परंतु दिल्लीत अनेक वर्षांपासून तळ ठोकून असलेले नेते यामुळे अस्वस्थ झाले आणि ते सगऴे राहुल गांधी यांना अयशस्वी करण्यासाठी किंवा अयशस्वी दाखवण्यासाठी सज्ज झाले. काहीही करून राहुल यांनी नेतृत्व सोडून द्यावे, असा त्यांचा प्रयत्न होता आणि 2019 मध्ये या मंडळींचा हा प्रयत्न यशस्वी झाला, असे निरुपण निरुपम यांनी केले आहे.
या नेत्यांनी राहुल गांधी यांनी केलेला प्रत्येक प्रयोग हाणून पाडण्यासाठी प्रयत्न केले. केवळ या नेत्यांची मक्तेदारी संपत आली होती, त्यामुळे त्यांनी राहुलना विरोध करण्यास सुरुवात केली.उदाहरणार्थ, ‘शक्ति अॅप’. राहुल गांधी यांनी मोठ्या उत्साहाने हे ऍप सुरू केले. मात्र काँग्रेसच्याच लोकांनी वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून याच्या विरोधात मोहीम राबवली. ही सिस्टिम फ्रॉड असून डेटा ॲनालिस्ट प्रवीण चक्रवर्ती 24 कोटी रुपये घेऊन पळून गेला, अशा बातम्या पसरविण्यात आल्या. खरेतर अशी प्रणाली देशातील एकाही पक्षात नव्हती. यात देशभरातील प्रत्येक बूथची माहिती होती.
काँग्रेसमधील प्रत्येक नेता आपल्या समर्थकांना जास्तीत जास्त तिकीटे मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याने तिकीट दिलेले किती जण निवडून आले आणि किती पडले, हे कोणीही विचारत नाही. राहुल गांधी यांनी अशी विचारणा करायला आणि पक्षात जबाबदारीचे भान आणायला सुरुवात केली. त्यामुळे ही मंडळी खवळली, असे ते म्हणतात.
काँग्रेस पक्ष सध्या अत्यंत अडचणीच्या काळातून जात आहे. त्याला एक कारण हा पक्ष सध्या राहुल आणि सोनिया गांधी यांच्यात विभागला गेला आहे. या मायलेकरांमध्ये शीतयुद्ध सुरू असून त्यांच्यात पटत नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यावरही निरुपम यांनी भाष्य केले आहे. राहुल यांच्या टीममधील सगळ्यांना सोनियांबाबत अपार आदर आहे. मात्र सोनिया यांचा बाहेरच्या जगाशी संबंध खूप कमी झाला आहे. सोनियांचे सल्लागार पूर्वग्रहदूषित आहेत. ते राहुलविरोधी आहेत. हे लोक कट कारस्थाने करणारे असून ते सतत कारस्थान करत असतात, असा दावा निरुपम यांनी केला आहे.
निरुपम यांच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे, हे त्यांचे तेच जाणोत. पण यामुळे काँग्रेसमध्ये गंभीर समस्या निर्माण झाली आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे