मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या तीन सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोटोकॉलमुळे रद्द करण्यात आल्यानंतरही अमोल कोल्हे यांनी माघार न घेता मोबाईलवरुन सभा घेतली. त्यांनी अंधारात रस्त्याच्या कडेला उभे राहून मोबाईलच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले.

राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे हे स्टार प्रचारक असून कोल्हेंना पंतप्रधानांच्या सभेमुळे परवानगी नाकारली गेल्याने राष्ट्रवादीचे समर्थक काहीसे खट्टू झाले होते. परंतु कोल्हेंनी सभा घेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. समोर श्रोते नसताना रस्त्याच्या कडेला उभे राहून सभा झाली. असा अभिनव प्रकार वक्ता चांदवड नाशिक, तर मतदार भोसरी आणि चिंचवडमध्ये घडला.

नियोजित सभा पिंपरी चिंचवड आणि भोसरी याठिकाणी होत्या. परंतु पूर्वपरवानगी असतानाही ऐनवेळी एरंडोलमधून हेलिकॉप्टर उड्डाणासाठी परवानगी नाकारण्यात आली. मग औरंगाबाद येथे जाऊन चार्टर्ड विमानाने पुणे येथे येण्यासाठी प्रयत्न केला. पण विशेष म्हणजे औरंगाबादची परवानगीही पंतप्रधान सर्किटमध्ये नसतानाही नाकारण्यात आल्याचा आरोप अमोल कोल्हेंनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

ते एरंडोलवरुन पुण्याला यायला निघाले. चिंचवड आणि भोसरी या दोन्ही ठिकाणी शक्य झाल्यास लाईव्ह स्क्रीनिंग करु, असे सांगितले. पण ते ‘डिजिटल इंडिया’च्या दैदिप्यमान यशामुळे शक्य झाले नसल्याचा टोलाही अमोल कोल्हेंनी लगावला. राजकीय प्रचारासाठी पंतप्रधान स्वत: पुण्यात आले होते. राजशिष्टाचारामुळे इतरांना प्रचारापासून वंचित राहावे लागत आहे, हे कितपत सयुक्तिक आहे. असा प्रश्न पडल्याचेही कोल्हे म्हणाले.

Find out more: