नवी दिल्ली – नेहमीच वादग्रस्त करुन पक्षाच्या अडचणीत वाढ करणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ ऐवजी ‘राष्ट्रपुत्र’ असे संबोधले आहे. पुन्हा एकदा त्यांच्या या व्यक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
त्यांनी हे वक्तव्य भोपाळमध्ये माध्यमांशी बोलताना केले. त्या म्हणाल्या, महात्मा गांधी हे राष्ट्रपुत्र असून त्यांच्यावर देश कायम प्रेम करीत राहिल, त्यांना स्मरणात ठेवेल. दरम्यान, भाजपने मध्य प्रदेशात महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘गांधी संकल्प यात्रे’चे आयोजन केले होते. पण या यात्रेत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर सहभागी झाल्या नव्हत्या. त्यानंतर त्यांनी आता गांधींबाबत वादग्रस्त दावा केला आहे.
पत्रकारांनी साध्वींना विचारले की, गांधी संकल्प यात्रेत तुम्ही सहभागी का झाला नाहीत. त्यावर त्या म्हणाल्या, गांधी हे राष्ट्राचे पुत्र आहेत. त्यांच्याप्रती मला आदर असल्यामुळे यावर आता मला कसलेही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. देशासाठी ज्यांनी काम केले आहे असे सर्वजण माझ्यासाठी आदरणीय आहेत. महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गावर मी कायम चालत राहीन. आपल्याला ज्या लोकांनी मार्गदर्शन केले त्यांचे आपण निश्चितच आभार मानायला हवेत, त्यांच्या पावलांवर पावले टाकायला हवीत, असेही साध्वींनी म्हटले आहे.