शिर्डी : मतदानानंतर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाकडे केली. जनतेच्या मनात कायम संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असल्याने ही मागणी केल्याचं थोरात यांनी सांगितलं.
सर्व्हेतून दिले जाणारे अंदाज कल्पनेच्या पलीकडचे आहेत, मात्र खरी वस्तूस्थिती वेगळी आहे. अंदाज दाखवून ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपची सत्ता येत असल्याचं दाखवण्यात आलंय, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अक्षरशः सुपडासाफ झाल्याचंही सर्व्हेत दिसून येतंय. पण परिस्थिती वेगळी असून जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय, असं बाळासाहेब थोरात यांचं म्हणणं आहे.
टीव्ही 9- सिसेरो यांच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 123, तर शिवसेनेला 74 जागा मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजे या एक्झिट पोलनुसार ‘अब की बार 200 पार’ चा नारा पार करण्यातही महायुती काही पावलं मागे राहण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस 40 आणि राष्ट्रवादी 35 जागा मिळवत शिवसेनेने एकट्याने मिळवलेल्या जागांची बरोबरी करेल, असा अंदाज आहे.