शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मी आणि शरद पवार यांनी सोबत बसून देवेंद्र फडणवीस यांचा प्रत्येक शब्द ऐकला, असं यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (8 नोव्हेंबर) राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका व्यक्त केली. यावर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे आणि सरकार स्थापन झालेलं नाही.

त्यामुळे राजीनामा द्यावा लागतो. मी आणि शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण पत्रकार परिषद आणि त्यातील प्रत्येक शब्द ऐकला. यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील.”

शिवसेनेमुळे कोणतीही चर्चा थांबलेली नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची चर्चा झालेली नसल्याचं देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अशी चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपनं त्यांच्या विचारधारेच्या विरुद्ध विचारधारेशी युती केली आहे. मोदींवर टीका करणाऱ्यांसोबत युती करुन मांडीला मांडी लावली आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेबद्दल असं बोलू नये, असंही राऊत यांनी नमूद केलं.

                                            


Find out more: