देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद बोलावली. फडणवीसांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर 4.30 वा पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही माध्यमांशी बोलण्यासाठी संध्याकाळी 6 वाजताचं निमंत्रण दिलं. त्यामुळे उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती.
विधानसभा निकालादिवशीच आपण पत्रकार परिषदेसाठी इथे भेटलो होतो. आज थोड्यावेळापूर्वी मी महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली. त्यांनी मागील 5 वर्षात जे अचाट कामं केली ते सांगितली. मी त्यांना धन्यवाद देतो.
आम्ही त्यांच्यासोबत 5 वर्ष राहिलो नसतो तर त्यांना करता आली नसती. म्हणजेच आम्ही विकासाच्या आड आलो नाही. आम्ही शब्द पाळतो. बाळासाहेबांकडून मी तेच शिकलो आहे.
आमचं काय ठरलं होतं याला सर्व साक्षी आहेत. लोकसभेच्यावेळी युतीसाठी मी दिल्लीत गेलो नव्हतो ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यासाठी मी लाचार नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचं वचन दिलं होतं. ते मी पूर्ण करणार. त्याच्यासाठी भाजप, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही.
हे आम्हाला गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते. इतर कोणी मुख्यमंत्री असतं तर पाठिंबा दिला असता की नाही माहित नाही.