मुंबई: राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु असतानाच सत्तास्थापनेची संधी युती आणि आघाडीतील पक्षांना असल्याने त्यांनी आपली जुळवाजुळव सुरू केली आहे. त्याचवेळी पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना धीर दिला. त्यांनी आपल्या आमदारांना राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. चिंता करू नका, अशी ग्वाही दिली.

राज्यात विधानसभा निवडणूक निकालानंतर जवळपास २० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तास्थापनेचा तिढा राज्यातील प्रमुख पक्षांना सोडवता न आल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिफारस केल्यानंतर त्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी देऊन ती फाईल राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवली.

राज्यात काल राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. पण युती आणि आघाडीतील पक्षांना अद्यापही सत्तास्थापनेची संधी आहे. प्रत्येक पक्षाने त्यादृष्टीने जुळवाजुळव सुरू केली आहे. राज्यात नव्याने होऊ घातलेल्या संभाव्य शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या आघाडीतील नेत्यांनी किमान समान कार्यक्रमावर चर्चेला सुरुवात केली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांची शरद पवार यांनी मुंबईत बैठक घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. चिंता करू नका, आमदारांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागणार नाही, अशा शब्दांत त्यांनी दिलासा दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जणांची समिती काँग्रेससोबत किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी स्थापन केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचा या समितीमध्ये समावेश आहे.


Find out more: