मुंबई – संजय राऊत यांनी लीलावती रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गुरूवारी पत्रकार परिषदेद्वारे पुन्हा एकदा शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. बंद दरवाज्याआड शिवसेना आणि भाजपमध्ये जी काही बोलणी झाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ती का सांगितली नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत ही बोलणी झाली. आमच्यासाठी ती खोली मंदिरासमानच आहे. आम्ही बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो खोटे बोलणार नाही, असा घाणाघात राऊत यांनी यावेळी केला. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणुकीदरम्यान मते मागितल्यामुळे निवडणुकीदरम्यान ठरवलेल्या गोष्टी त्यांना कळणे अपेक्षित होते. त्यांच्याप्रती आमचा आदर आहे.
ज्या गोष्टी बंद खोलीत ठरतात, त्यावर जेव्हा अंमल होत नाही त्यावेळी त्या बाहेर येतात, असे राऊत म्हणाले. तसेच बाळासाहेबांनी ज्या खोलीत बसून हिंदुत्वाचा संदेश दिला, ज्या खोलीत बाळासाहेबच बसत असत त्या खोलीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. ती खोली म्हणजे आम्हाला मंदिरासमान आहे. या खोलीत झालेल्या गोष्टी खोट्या असल्याचे जर कोणी म्हणत असेल तर तो बाळासाहेबांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री जेव्हा आम्ही म्हणून करत होतो, शिवसेनेने तेव्हा आक्षेप का घेतला नाही, असे शहा म्हणाले. पंतप्रधानांचा आम्ही आदर करतो आणि आम्हाला निवडणुकीच्या रणधुमाळीत ते करायचे नव्हते. त्यांचा आदर भाजपला जरी नसला तरी त्यांचा आम्ही आदर करतो. म्हणून आम्ही त्यावेळी त्यावर काही आक्षेप घेतला नाही. बंद दाराआडच्या चर्चा योग्य वेळी मोदींपर्यंत पोहोचल्या नाहीत.
कोणत्या कारणामुळे युती झाली हे त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. पंतप्रधानांना खोटे पाडण्याची आम्हाला इच्छा नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान राऊत यांनी यावेळी भाजपला अप्रत्यक्षरित्या इशारा दिला. कोणीही आम्हाला धमक्या देऊ नयेस कारण आमच्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. आम्ही प्राण देऊ, पण घाबरणार नाही. धमक्या देणाऱ्यांनाही संपवू, असेही त्यांनी म्हटले आहे.
9 PM