मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरच शिवसेना वेगळी झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणं आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. काँग्रेसला सत्तेत यायचंच नाही, तर मागण्या कुठून समोर यायला लागल्या? मला नाही वाटत.
त्यांना तर बाहेरुन पाठिंबा द्यायचा आहे, आमची इच्छा आहे की त्यांनी सत्तेत यावं. पद, खाती याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. येत्या दिवसात कोणताही वाद होणार नाही. आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करु” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एक वृत्त वाहिनीला दिली.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर आता नवं सरकार स्थापन करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी आहे. भाजप आणि शिवसेनेचं बिनसल्यामुळे महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. भाजपने शब्द फिरवल्याचा आरोप करत शिवसेनेने त्यांच्याशी फारकत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सरकार स्थापनेसाठी प्रस्ताव दिला. याच पार्श्वभूमीवर महासेनाआघाडीच्या चर्चा आणि बैठका युद्धपातळीवर सुरु आहेत.
कोणाला किती आणि कोणती मंत्रिपदं मिळणार, तसंच किमान समान कार्यक्रम काय यावर वाटाघाटी सुरु आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्रिपदावर मोठं भाष्य केलं आहे. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असेल असं नवाब मलिक यांनी सांगितलं. पर्यायी सरकार निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे.
तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकणार नाही. शरद पवार मुंबईत आहेत, ते दिल्लीला जाणार नाहीत. काँग्रेसचा निर्णय आल्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करु, असं नवाब मलिक तीन दिवसापूर्वी म्हणाले होते.