नवी दिल्ली – अनेकजण सोशल मीडियावर मान्यवर व्यक्ती, नेते, सेलिब्रिटी यांच्यासोबतचे फोटो काढून पोस्ट करतात. तसेच काहीवेळा या फोटोंचा गैरवापरही केला जातो. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीसोबत फोटो काढून त्याचा वापर करून इतरांची फसवणूक करण्याचे प्रकारही घडतात.
आता याविरुद्ध सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येणार असून पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासह मान्यवर व्यक्ती किंवा राष्ट्रीय चिन्ह यांचा चुकीचा तसेच व्यावसायिक फायद्यासाठी वापर केल्यास आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्रच्या फोटोचा चुकीचा वापर केल्याच्या तक्रारीनंतर चिन्ह आणि नाव यांच्या कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
चुकीचा किंवा व्यावसायिक कारणासाठी देशाचे राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या फोटोचा वापर केल्यास कारवाई करण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. तुरुंगवासाची शिक्षा चिन्ह, फोटो आणि नावाचा चुकीचा वापर केला गेल्यास होऊ शकते.
चुकीचा आणि पूर्वपरवानगीशिवाय व्यवसायासाठी देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींच्या फोटोचा वापर केल्यास 1 ते 5 लाख रुपयांचा दंड आणि 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. याआधी राष्ट्रीय ध्वज, अशोक चक्र यांचा चुकीचा वापर केल्यास फक्त 500 रुपये इतका दंड आकारला जात होता.
याआधी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरून डिजिटल इंडिया अभियानाला चालना देण्यासाठी पंतप्रधानांच्या फोटोचा वापर करण्यात आला होता. यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून खबरदारी घेण्याच्या दृष्टीने नियम कडक करण्यात येत आहेत.