सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा पळून गेल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे. विधानसभा निवडणूक निकाल लागून महिनाही झालेला नाही. लवकरच शिवसेना नेतृत्त्वात महाराष्ट्रात स्थिर सरकार येईल असाही विश्वास संजय राऊत यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. मी आत्ता दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला आलो कारण महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला आहे आणि शरद पवार हे देशाचे कृषीमंत्री होते. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडण्याच्या अनुषंगाने मी त्यांच्याशी चर्चा केली असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात जो काही सत्तापेच निर्माण झाला आहे त्याला शिवसेना जबाबदार नसून भाजपा जबाबदार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली ती पळून गेलेल्या भाजपामुळे झाली असाही आरोप संजय राऊत यांनी केला.

दिल्लीत आज राजकीय घडामोडींना वेग आला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली असेल असंच वाटलं होतं.

मात्र शरद पवार यांनी या भेटीनंतर जी पत्रकार परिषद घेतली त्यात महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर चर्चा झाली मात्र सरकार स्थापनेबाबत काहीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं आहे. तसंच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतही चर्चा झाली नाही किंवा किमान समान कार्यक्रमही ठरलेला नाही असंही वक्तव्य केलं. शरद पवार यांनी हे वक्तव्य करताच संजय राऊत दिल्लीला रवाना झाले.

दिल्लीतल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना संजय राऊत यांनी सांगितलं की महाराष्ट्रात जो ओला दुष्काळ पडला आहे त्यासंदर्भात मी पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना सत्तास्थापनेच्या पेचाबाबत प्रश्न विचारला गेला. त्या प्रश्नाला उत्तर देताना लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि ते सरकार स्थिर असेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.


Find out more: