मुंबई : माजी विरोधी पक्षनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी अखेर आपण पक्षाबरोबर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. मुंडे यांनी म्हटले आहे की, “मी पक्षाबरोबर आहे, मी शरद पवार यांच्याबरोबर आहे.
कृपया अफवा पसरवू नका.” धनंजय मुंडे हे कोणाच्या संपर्कात नसल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. अखेर सायंकाळी उशिरा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीस हजेरी लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिवसभर मात्र धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या संपर्कात आहेत, अशाच चर्चा सुरू होत्या.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील धनंजय मुंडे यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली होती. मुंडे यांच्या भूमिकेबाबत शिवसेनेच्या गोटातून साशंकता व्यक्त केली जात असल्याच्याही चर्चा सुरू असताना या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखेर धनंजय मुंडे यांनी आपण पक्षाबरोबर व शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे ट्विट करत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.