
सातारा : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र अजित पवारांच्या बंडामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती .याबात शरद पवार यांनी कराडमधील पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलं आहे.
याचबद्दलच्या प्रश्नाला पवारांनी “या सर्वांमागे माझा हात असेल असा तुमचा (पत्रकारांचा) गैरसमज असेल जनतेचा नाही,” असं म्हणत उत्तर देण्यास सुरुवात केली. “या मागे माझा हात असेल तर मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगितलं असतं आणि मी त्यांच्याबरोबर चर्चा केली असती.
त्यांना पटवून दिलं आणि सांगितलं तर ते माझ्या सूचनेचा अनादर करत नाहीत असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे यामागे माझा हात असेल असं म्हणण्यात काही अर्थ नाही,” असंही पवार म्हणाले .