मुंबई – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना सत्तेत येण्यापूर्वीच वेड लागले, असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांनी राज्यपालांवर जास्त बोलू नये. संजय राऊतांना सत्तेची वाट पाहताना वेड लागले असल्यामुळे काही दिवसांनी वेड्यांच्या रुग्णालयात राऊतांना दाखल करावे लागणार आहे. त्यांना मानसिक उपचाराची गरज असल्याची घणाघाती टीका दानवे यांनी केली आहे.

घटनात्मक बाबी राज्यपालांनी पूर्ण केल्या नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. रावसाहेब दानवे यांनी त्याला उत्तर दिले आहे. घटनेची राज्यपालांनी पायमल्ली केली नाही. घटनात्मक चौकटीत राहूनच त्यांनी निर्णय घेतला आहे. भाजपला सत्ता स्थापनेची संधी आमदारांच्या सह्यांचे पत्र आणि गटनेत्यांची उपस्थिती असल्याने दिल्याचे दानवे यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे अडचणीत आहे. त्यांना मदत करण्यासाठी भाजपचे आमदार बांधावर आहे. पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहून मजा करत असल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे. तसेच, अजूनही अजित पवार राष्ट्रवादीचे गटनेते असून तेच व्हीप काढतील. तो त्यांच्या आमदारांना लागू पडणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

Find out more: